बुद्ध स्तुपा पॅनेल,नागर्जुनकोंडा,गुंटूर जिल्हा,आंध्रप्रदेश.
नागर्जुन कोंडा येथील महाचैत्याच्या सभोवती या प्रकारचे बुद्ध प्रसंग सांगणारे पॅनल लावण्यात आलेले होते.
या स्तुपाच्या खालच्या भागात आपल्याला दोन स्तंभ दिसत असुन त्यावर धम्मचक्र कोरण्यात आलेले आहे.म्हणजेच ते धम्मचक्र स्तंभ असुन त्याच्या बाजूला सिंह कोरण्यात आलेले आहेत.ते स्तंभ प्रदक्षिणा मार्गाच्या इथे असावे त्याची पूजा करताना उपासक दिसत आहेत.
मध्यभागी आपणास अभयमुद्रेतील बुद्ध दिसत असुन बुद्ध हे नागराजच्या वेटोळ्यावर बसलेले दिसत आहेत.अनेकदा बुद्ध हे आपल्याला सिंहासनावर बसलेले दिसतात याठिकाणी ते नागराजावर विराजमान आहेत.
हा नागराज सात फन असलेला असुन बुद्धांच्या डोक्यावर त्याने ते फन धरलेले आहेत याचा अर्थ एक प्रकारे नागराज बुद्धांच रक्षण करतोय याठिकाणी बुद्धांच दाखवलेले प्रभावलय हे बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाल्याचं द्योतक आहे.त्याच्या वरच्या चौकोनात बुद्धांना वंदन करताना काही साधुमुनी दाखवलेले आहेत.त्याच्या वर पाच स्तंभ दाखवलेले असुन मध्यभागी असलेल्या स्तंभाच्या वर एक लघु स्तुप कोरलेला असुन त्याच्यावर देखील सात फन असलेला नाग दाखवलेला आहे.बाकीच्या चार खांबांवर राजकुमार सिद्धार्थचा मुकुट ठेवलेला असुन ते बुद्धांचे केस धातु म्हणुन पुजनिय आहेत.स्तूपाचा गोलाकार भाग हा चांगल्या प्रकारे सजविण्यात आलेला आहे.स्तंभाच्या अगदि डाव्या बाजुला कोपऱ्यात भीक्खु द्रोन हे बुध्दांच्या अस्थीधातु हे विभाजित करताना दाखवलेले आहेत.त्यांच्या हातात तसेच डोक्यावर आपल्याला स्तुप दिसत आहेत.तसेच बुद्धांचे अस्थी धातु मिळविण्यासाठी नागराजे प्रयत्न करत आहेत.तसेच उजव्या बाजूला दोन नागराज काहीतरी चर्चा करत असताना दिसत आहेत.त्याच पट्टीत दोन्ही बाजूला गरुडाची चोच असलेले सिंह दिसत आहेत.
सर्वात वरच्या बाजुला हर्मिका असुन त्यावर तीन छत्रावली असुन दोन व्यक्ती हातात काठी घेऊन त्यावर फडकणारा कपडा आपल्याला दिसत आहे.त्याच्या शेजारील व्यक्तींच्या हातात फुलांचे हार तसेच सुगंधीत द्रव्याने भरलेली पिशवी सदृष वस्तु दिसत आहे.तसेच गंधर्व हे वाद्य वाजवत प्रार्थना बोलत आहेत तसेच सुगंधित फुलांचा वर्षाव स्तूपावर करताना दिसत आहेत.या प्रकारे स्तूपाची पूजा करण्याची प्रथा त्याकाळात प्रचलीत होती.विनयपिटका मध्ये स्तूपाची पूजा कशा प्रकारे करण्यात यावी याचे वर्णन येते.बौद्ध भीक्खु हे सुगंधीत द्रव्याने स्तुपाला पुसत असत तसेच त्यावर सुगंधित द्रव्य शिपडत असत.याच प्रकारे बुद्धांच्या मूर्तीची देखील पूजा करत असत त्याचा उल्लेख चीनी भीखु यिजिंग यांनी केला आहे.ते बिहारच्या नालंदा महाविहारात दहा वर्षे राहिलेले असुन त्याठिकाणी असलेलं भिक्षु हे दररोज बुद्धांच्या मूर्तींना दररोज सुगंधीत द्रव्याने पुसले जायचे .तसेच स्तूपाची पूजा करता वेळी फुले वाहताना चंदनाचे लाकुड जाळण्यात येत असे जेणेकरून स्तुपा मध्ये असलेले शरीरधातु हे नेहमी सुगंधीत राहतील व तिथला परिसर देखील सुगंधीत राहत असेल.हा शिल्पपट आपल्याला बुद्ध,बुद्धांचे शरीरधातु त्यांना कशा प्रकारे वंदन करत असतील याचा संदेश देतो.
सिद्धार्थ कसबे.
Comments
Post a Comment